विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव शिगेला पोहोचला असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA) देशातील विविध राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. ( Indias full preparations orders for mock drills in states on May 7 instructions to train citizens)
या मॉक ड्रिल अंतर्गत एअर रेड सायरन सक्रिय करणे, नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देणे, तसेच स्थलांतर योजना, ब्लॅकआऊट उपाययोजना, महत्त्वाच्या प्रकल्पांची लवकर छुपवणूक (कॅमोफ्लाजिंग) यांचा आढावा घेऊन त्याची प्रत्यक्ष तयारी करून घेण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाच्या या निर्णयामागे सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याचा उद्देश आहे. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. भारत सरकारने यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यात इंडस जलसंधीचा निलंबन, अटारी सीमेवरील वाहतूक बंद, पाकिस्तानी नागरिकांना जारी करण्यात आलेल्या सर्व व्हिसांचे रद्दबातल करणे, तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई हद्द बंद करणे या कारवायांचा समावेश आहे.
पाकिस्ताननेही प्रत्युत्तरात भारताशी सर्व व्यापार बंद केला असून, भारताचे कोणतेही विमान त्याच्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातली आहे. सीमारेषेवर गेल्या १० दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघनही सुरू आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन केले. या बैठकींमध्ये मोदींनी लष्कराला “पूर्ण स्वातंत्र्य” दिले आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य स्थळी प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सात मे रोजी होणारी मॉक ड्रिल ही या साऱ्या पार्श्वभूमीवर नागरी सज्जता व बचावाचे प्रशिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.