विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादावर कठोर प्रहार करताना एकेकाळच्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून बंदुकांऐवजी पुस्तकांचा आधार घेत गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाविरोधात एक नवा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील युवकांना सकारात्मक दिशेने वळवण्यासाठी “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, अल्पावधीतच तो परिवर्तनकारी ठरला आहे. ( An Innovative Initiative by Gadchiroli Police Inspired by the Chief MinisterOne Village One Library – Education as a Weapon Against Naxalism)
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “दोन वर्षांपूर्वी केवळ एका वाचनालयापासून सुरुवात केली होती. आज जिल्ह्यात ७१ वाचनालये कार्यरत आहेत आणि त्यांचा उपयोग ८,००० हून अधिक तरुण-तरुणी करत आहेत. नलगुंडा सारख्या दुर्गम भागात वाचनालयाला पोलीस पोस्टच्या वाय-फायशी जोडून इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.”
या वाचनालयांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग, पुस्तके, वाय-फाय आदी सुविधा मिळतात. ही वाचनालयं फक्त अभ्यासाची जागा नसून भविष्य घडवण्याचं माध्यम बनली आहेत.
या उपक्रमाचा थेट परिणामही दिसून येतोय. गेल्या अडीच वर्षांत २०५ युवक पोलीस सेवेत भरती झाले असून अनेकजण महसूल विभागात आणि इतर शासकीय पदांवर निवडले गेले आहेत. यामुळे स्थानिक तरुणांच्या आयुष्याला नवा मार्ग मिळतोय.
नंदकुमारी हिडमे ही विद्यार्थिनी सांगते, “माझं गाव इथून ३ किमी अंतरावर आहे. पूर्वी मला स्पर्धा परीक्षांविषयी काहीच माहिती नव्हती. पण आता मी पोलीस भरतीची तयारी करतेय. या वाचनालयामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. आता मी आशावादी आहे की मी पोलीस परीक्षा पास होईन.”
पूर्वी नक्षलवादी युवकांना चुकीच्या दिशेने वळवत असत, असे नीलोत्पल म्हणाले. पण या उपक्रमामुळे युवकांना शिकण्याची आणि प्रगतीची संधी मिळतेय. यामुळे त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत आहे आणि भविष्य उभारण्याची नवी दिशा मिळतेय.
या उपक्रमातून गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात सामाजिक बदल घडतो आहे. युवक आता बंदूक न धरता पुस्तक हातात घेत आहेत. वाचनालय हे केवळ ज्ञानकेंद्र नाही, तर अशांततेच्या सावटातून बाहेर पडण्याचा मार्ग बनत आहे.