विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजब दावा केला आहे. शेवटची रांगच सर्वात महत्त्वाचे असते, असे त्या म्हणाल्या आहेत. (Insult to Uddhav Thackeray Supriya Sules strange claim saying the last row is the most important)
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. त्यावरून ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. यावरून सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेताना अजबच दावा केला. त्या म्हणाल्या, आपण सिनेमा पहायला जातो, त्यावेळी देखील मागच्या रांगेतले तिकीट काढतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसल्या वरुन जे टीका करत आहेत, त्यांनी कधी सिनेमा पाहिला नसेल! असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई तथा पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही,असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरुन सुळे त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचे सांगताना म्हणाल्या, माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी माझी आहे. मग तो चांगला असो किंवा वाईट असो, त्या सर्वांची जबाबदारी मी घेते. मात्र त्यांचे कुटुंब काय करते? याचा माझ्या पक्षाशी किंवा इतर कोणाचाही संबंध नाही.
सुळे म्हणाल्या की, डॉ. प्रांजल खेवलकर प्रकरणाचे दोन भाग आहेत. रोहिणी ताई या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मात्र, रोहिणी ताईंच्या नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलत नाही. पातळी सोडून मी राजकारण करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलणार नाही. हा पहिला भाग झाला. मात्र या देशामध्ये ‘राइट टू प्रायव्हसी’ हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे कोणाचाही मोबाईल पोलिसांनी जप्त केला तर तो केवळ कोर्टाला दाखवता येतो. कोणत्याही व्यक्तीला दाखवता येत नाही. तो जर दाखवला गेला असेल, त्यातील व्हिडिओ बाहेर दाखवले गेले असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा ठरतो. मात्र, अशा प्रकरणात काय करायचे याचा निर्णय सरकारचा असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.