विशेष प्रतिनिधी
तेहरान : इस्त्रायल आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका पाचव्या दिवशीही सुरूच आहे. इराणने दावा केला आहे की त्यांनी इस्त्रायलच्या गुप्तहेर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. ( Iran claims missile attack on Israels Mossad headquarters)
इराणच्या सरकारी तेहरान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणी क्रांतीकारी गार्डस (IRGC) यांनी ‘ग्लिलोट’ भागातील इस्त्रायली लष्करी गुप्तचर यंत्रणेचा भाग असलेल्या अमान लॉजिस्टिक सेंटरवर हल्ला केला. या भागामध्ये आग लागल्याचे दृश्य व्हिडिओद्वारे समोर आले आहे. हेच मोसादचे मुख्यालय असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणची सरकारी वाहिनी Press TV ने देखील याच दाव्याची पुष्टी करताना म्हटले आहे की, “इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणांच्या केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे त्यांचे महत्त्वाचे गुप्त ऑपरेशन केंद्र ध्वस्त झाले आहे.”
तथापि, इस्त्रायली संरक्षण दलांनी हे दावे फेटाळले असून, त्यानुसार “इराणने डागलेली क्षेपणास्त्रे फक्त बस पार्किंगजवळ कोसळली. कोणतीही महत्त्वाची हानी झालेली नाही,” असे सांगितले आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे केवळ किरकोळ नुकसान झाले असून, मोसाद मुख्यालयाला कोणतीही हानी पोहोचली नसल्याचा दावा इस्त्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी युद्धजन्य परिस्थिती त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून शांततेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.