विशेष प्रतिनिधी
तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एका गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर मोठा लष्करी हल्ला करत किमान ६ लष्करी तळांवर हवाई बॉम्बहल्ले केले. हे सर्व तळ तेहरानच्या परिसरात असून, त्यातील ४ तळ अणु कार्यक्रमाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. ( Israel attacks Iransix military bases destroyed two nuclear scientists and senior military officers killed)
या हल्ल्यात इस्रायली लष्कराने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर हुसेन सलामी, तसेच इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांच्यासह अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार केल्याचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर इराणच्या दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फेरेदून अब्बासी यांचाही मृत्यू झाला असल्याचे इस्रायली संरक्षण खात्याने म्हटले आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि इस्रायल काट्झ यांनी हल्ल्याची पुष्टी करत सांगितले की, “हे केवळ सुरुवात आहे. इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी क्षमतेला निष्प्रभ करणे ही आमची प्राथमिकता आहे.” इस्रायलचे लढाऊ विमान शुक्रवारी पहाटे ३ वाजता (स्थानिक वेळेनुसार) इराणी आकाशात घुसले आणि अचूक मार्गदर्शन प्रणालीद्वारे टार्गेट केलेल्या तळांवर स्फोट घडवून आणले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी राष्ट्राला उद्देशून भाषणात म्हटले की, “इराणकडे इस्रायलला हानी पोहचवण्याची मोठी क्षमता आहे. पण आमची तयारी अधिक भक्कम आहे. इस्रायली नागरिकांनी सरकारला पूर्ण सहकार्य करावे.”त्यांच्या भाषणानंतर इस्रायली सैन्याने तात्काळ सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. सर्व शाळा आणि शिक्षणसंस्था बंद ठेवल्या आहेत. सार्वजनिक सभा आणि गर्दीवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयांना सुट्टी दिली आहे. जेरुसलेममध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून १०० हून अधिक नागरिकांनी भूमिगत बंकरमध्ये आसरा घेतला
इराण सरकारकडून अद्याप या हल्ल्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र इस्लामी गार्डने म्हटले आहे की, “हे इस्रायली आक्रमण युद्ध घोषित करण्यासारखे आहे आणि इराण लवकरच त्याचा तीव्र प्रत्युत्तर देईल.”
इराणमधील भारतीय दूतावासाने एक अधिकृत नोटीस जारी करत भारतीय नागरिक आणि NRI लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अनावश्यक ठिकाणी जाणे टाळावे, गर्दीच्या भागांपासून लांब राहावे आणि दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.