विशेष प्रतिनिधी
पुणे : “आमच्याकडे असताना ते नेहमी पहिल्या रांगेत बसत. आमच्याकडे तर आमच्यापेक्षाही त्यांना जास्त मान दिला जात होता. त्यामुळे आता त्यांची सध्याची अवस्था पाहून वाईट वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. (It feels bad to see the current situation Devendra Fadnaviss attack on Uddhav Thackeray)
दिल्लीत नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आले होते. बैठकीतील हे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना मिळालेल्या मान-सन्मानावरून चिमटे काढले. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. त्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. भाषणात खूप म्हणायचं की, दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही; पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे ? हे बघितलं की दुःख होतं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर हल्ला चढवला. “काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांना जर हे मान्य असेल, तर आम्ही काय बोलणार? उलट तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना इतक्या मागच्या रांगेत का बसवलं?” असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.
महायुतीच्या नेत्यांच्या मते, बैठकीत दिलेले स्थान हे आघाडीत कोणाचा प्रभाव किती आहे, याचे प्रतीक आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाने मात्र यावर फारसा अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. खासदार संजय राऊत यांनी मागील रांगेत बसण्याचे कारण प्रकाशाची तीव्रता असल्याचे सांगून हा वाद टाळण्याचा प्रयत्न केला.