विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून थेट हल्लाबोल केला. भारतीय राजदूत अनुपमा सिंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाकिस्तान अजूनही जिहादी दहशतवादाचे केंद्र आहे. दहशतवादी हल्ल्यांचे प्रायोजक आणि आयोजक थेट पाकिस्तानी भूमीतूनच कार्यरत आहेत. पाकिस्तान स्वतः दहशतवादाला जन्म देतो, त्याला पोसतो आणि तरीही जगासमोर स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तान सिंधू नदी जलसंधीबाबतही सातत्याने खोटा प्रचार करतोय आणि जागतिक व्यासपीठांचा वापर करून ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळतो. ( It is Pakistan that feeds terrorism but pretends to be the victim Indias strong attack from the platform of the World Health Organization)
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मोठे हल्ले चढवत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून युद्धविरामावर तात्पुरती सहमती झाली आहे.
मात्र, पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या खोटेपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 32 वेगवेगळ्या देशांमध्ये 7 शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे एकूण 51 नेते आणि 85 राजदूत सहभागी असणार आहेत. यातील दोन शिष्टमंडळे बुधवार, 21 मे रोजी परदेशात रवाना होत आहेत. हे शिष्टमंडळे संबंधित देशांमध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करत, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या धोरणांवर जागतिक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहतील