विशेष प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात संशयित भूमिका असलेल्या पोलीस महानिरीक्षक (आयजी) जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. “तुरुंगात असलेल्या आरोपींना ३०० कोटी रुपये दे,अशी मागणी सुपेकर यांनी केल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे,” असा गौप्यस्फोट आमदार धस यांनी बीडमधील एका जाहीर सभेत केला. (Jalindar Supekar demanded Rs 300 crore from the accused in jail alleges MLA Suresh Dhas)
या प्रकरणात बोलताना धस म्हणाले, “एक आयजी पदावरील अधिकारी चेकद्वारे १ लाख रुपये आणि रोख ५० हजारांचा मोबाईल घेतो, हे दुर्दैवाचे आहे. सुपेकर यांच्याविरोधात अनेक तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तुरुंगातील आरोपींना ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. एवढेच नव्हे, तर आरोपीच्या नातेवाईकांच्या सुनांकडून पैसे मागितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की सुपेकर १०० टक्के दोषी आहेत.”
धस यांनी पुढे सांगितले की, “नैतिकतेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. गोष्टींचा स्तर किती घसरला आहे, याचे हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची १५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आता ही संपत्ती वाचवायची की जाळायची, हा प्रश्न आहे. अशा व्यक्ती कितीही वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्या तरी समाज त्यांच्यावर घृणाच करेल. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर शेण फेकले, तर शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकले. मात्र, केवळ टोमॅटो फेकून उपयोग नाही, अशांवर कवटं फेकण्याची वेळ आली आहे. हगवणे कुटुंबीय जामिनावर बाहेर आले, तर त्यांच्यासाठी गाडी आणि कवटं तयार ठेवा. सुपेकर मिळाले तर त्यांच्यावरही हेच करायला हवे.”
दरम्यान, वैष्णवीच्या पती शशांक व दीर सुशील हगवणे यांच्यावर खोटा पत्ता वापरून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांकवर वारजे तर सुशीलवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हगवणे कुटुंब पुणे ग्रामीणमधील पौड हद्दीत वास्तव्यास असून, २०२२ मध्ये त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी पुणे शहरातील खोटे पत्ते दाखवत भाडेकरार करून परवाना मिळवला. त्यानुसार पिस्तूल खरेदीही करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात शशांक व सुशील यांचे मामा आणि वैष्णवी हगवणे प्रकरणात संशयित ठरलेले जालिंदर सुपेकर यांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.