जालना शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना कंत्राटदाराकडून ₹10 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. (A major corruption case has rocked Jalna city as Municipal Commissioner Santosh Khandekar was caught red-handed by the Anti-Corruption Bureau (ACB) while accepting a ₹10 lakh bribe from a contractor.)
ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, महापालिकेच्या बांधकाम विभागातील थकित बिल मंजूर करून देण्यासाठी खांडेकर यांनी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती.त्यानंतर कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली, आणि सापळा रचून खांडेकर यांना लाच घेताना पकडण्यात आले.
घटनेनंतर एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानावर झडती घेतली असून, संबंधित कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणानंतर जालना शहरासह संपूर्ण विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती, ज्याचा पहिला हप्ता म्हणून ₹10 लाख देण्यात येणार होते.
त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत खांडेकर यांना रंगेहात पकडले.
संतोष खांडेकर यांनी यापूर्वी जालना नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलं होतं आणि पदोन्नतीनंतर ते महापालिकेचे आयुक्त झाले होते. सध्या महानगरपालिकेची नवीन इमारत बांधकामाधीन असून, या संदर्भातील ठेकेदाराशी आर्थिक व्यवहारातूनच हा लाचकांड उघड झाल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणामुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी सखोल चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.