विशेष प्रतिनिधी
पुणे : माझा भाऊ चुकीच्या लोकांबरोबर गेला, हीच त्याची चूक आहे. या घटनेत माझा भाऊ असला, तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले. ( Kalakendra firing case MLA Shankar Mandekar said my brother went with the wrong peoplethis is his mistake)
दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील भोर-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना रोजी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत आमदार शंकर मांडेकर म्हणाले, काल दुपारी मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होत आहे. मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की, कायद्याप्रमाणे रीतसर कारवाई करा. फिर्यादीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर तो दाखल होईलच. चुकीचं काही घडलं असेल, तर मी हस्तक्षेप करणार नाही, मग माझा भाऊ या प्रकरणात असला तरीही त्यांच्यावर कारवाई होईल.
माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नाही. ज्याच्याकडे बंदूक आहे, त्याला पोलिस विचारतील. माझा भाऊ शेती आणि समाजकारणात सक्रिय आहे, तसेच तो वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. कोणी कुठे जावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. या घटनेत माझा भाऊ असला, तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही, असे सांगुं मांडेकर म्हणाले की, घटना घडल्यानंतर त्यांचा भाऊ सकाळी घरी आला, पण त्याने या घटनेबाबत काहीही सांगितले नाही. त्या वेळी ते स्वत: रस्त्याची पाहणी करण्यासाठी बाहेर गेले होते आणि गणेश जगतापही तिथे उपस्थित होते. माझा भाऊ चुकीच्या लोकांबरोबर गेला, हीच त्याची चूक आहे. ही घटना निंदनीय आहे आणि त्यावर कारवाई झालीच पाहिजे. चार भावांपैकी एक चोर असतो, एक देव असतो. पण चुकीची शिक्षा मिळेलच.
अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रुईकरांची पार्टी होती. मात्र, त्याचवेळी संशयित आरोपी यांनीही त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला. त्यातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र पोलिसांनी कोणीही तक्रार द्यायला आले नाही म्हणून काहीही केले नाही. परंतु, ज्यावेळी आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर येऊ लागले, तेव्हा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली.