विशेष प्रतिनिधी
बीड : माझ्याशी जर कुणाचे राजकीय वैर असेल, तर ठेवा. पण माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी करणे चुकीचे आहे. बाहेरून आलेले असोत की याच मातीतले असोत, कुणीही असो बीडच्या नावाला डाग लावू नका, असा इशारा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ( Keep political enmity with me Dont tarnish the name of PanbeedDhananjay Munde tells the opposition)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंनी दीर्घ काळानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 200 दिवस मी गप्प बसलो. डबल सेंच्युरी झाली. पण या काळात बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली, ती जिव्हारी लागली,
मुंडे यांनी आपल्या शैलीत शेरोशायरी सादर करत विरोधकांवर निशाणा साधला. धनंजय मुंडे म्हटले की, तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता!”
मी तटकरे साहेबांना सांगितले होते की मला भाषण करायचे नाही. पण आज जनतेसमोर उभे राहून हे बोलणे आवश्यक वाटले. मैदानात बोलायचे की सभागृहात हा प्रश्न होता. शेवटी मैदानातच बोलणे योग्य वाटले, असेही त्यांनी सांगितले.
मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याने अनेकदा महाराष्ट्राला दिशा दिली आहे. यापुढेही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पक्ष मजबूत करायचा आहे. हीच आपल्या मातीची, स्वाभिमानाची जपणूक आहे.