विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : “पहलगाम दहशतवादी हल्ला हा चुकून घडलेला प्रकार नव्हता, तर योजनाबद्ध धार्मिक हिंसाचार होता. धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या असे काँग्रेसचे खासदार आणि केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य डॉ. शशि थरूर यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासात एका विशेष कार्यक्रमात बोलताना सांगितले
( Killings targeting only people of one religionShashi Tharoor presented the reality of Pahalgam attack at the Indian Embassy in the US)
थरूर म्हणाले, या हल्ल्यात हल्लेखोरांनी धर्म विचारून निवडकपणे हिंदूंना गोळ्या घातल्या.२६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिक होता. सर्व जण हिंदू होते. कोणतेही अपघाती किंवा अंदाधुंद हिंसेचे कृत्य नव्हते. हल्लेखोरांनी मुस्लिम आणि हिंदू यांच्यात फरक ओळखून, हिंदूंना टार्गेट केले. एका हिंदू प्राध्यापकाने ‘कलमा’ म्हणत आपला जीव वाचवला. दुसऱ्या प्रकरणात, एका हिंदू पुरुषाला गोळ्या घालून त्याच्या पत्नीला सांगितले गेले, ‘जा आणि जगाला सांग, तुझा नवरा हिंदू होता म्हणून मारला गेला.’ हे धर्माधारित टार्गेटिंगचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.”
थरूर यांनी यावेळी भारतीय समाजाच्या परिपक्वतेचे आणि संयमाचे कौतुक केले. “देशभरात कुठेही हिंसाचार उसळला नाही. संपूर्ण देश एकसंघ उभा राहिला आणि या अमानवी कृत्याला शांततेने उत्तर दिलं, ही भारताची खऱ्या अर्थाने लोकशाही आणि सुसंस्कृततेची ताकद आहे,” असे ते म्हणाले.
काश्मीरच्या सामाजिक आणि आर्थिक बदलांवर भाष्य करताना थरूर म्हणाले, गेल्या वर्षी काश्मीरमध्ये अमेरिकेच्या अस्पेन (कोलोरॅडो)पेक्षा अधिक पर्यटक आले. हे फक्त पर्यटन नव्हे, तर काश्मीरमध्ये स्थिरता आणि समृद्धीचं द्योतक होतं. या बदलावर घाला घालण्यासाठीच हा हल्ला घडवण्यात आला. कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीरमध्ये स्थैर्य निर्माण झालं होतं. पण त्या प्रगतीला खिळ लावण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला.
थरूर यांनी यावेळी टीआरएफ (TRF -The Resistance Front) या दहशतवादी संघटनेबाबत सांगितले की हल्ल्यानंतर अवघ्या एका तासात टीआरएफ या दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे भारताला हल्ल्यामागे कोणाचा हात आहे hr ओळखायला फारसा वेळ लागला नाही,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानची जबाबदारी अधोरेखित केली.