विशेष प्रतिनिधी
मुंबई : बळीराजा संकटात असताना कृषि मंत्रिपदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले, पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान उपटले आहेत. ( Kokates behavior is extremely inappropriate Sunil Tatkare hints at action)
तटकरे म्हणाले, काही वेळेला माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय चुकीची वक्तव्ये केली. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली. त्यांनी पीकविमा आणि कर्जमाफी संदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्ये केली होती, तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओवर जो खुलासा केला तो ही अत्यंत चुकीचा होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे वागणे योग्य नाही.
शेतकऱ्यांच्याबद्दल सतत असंवेदनशील वक्तव्ये करणारे आणि कृषिखात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणून संबोधणारे कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याच मुद्यावर लातूर येथे छावा संघटनेने तटकरे यांच्याकडे कोकाटे यांना पदावरून हटवावे असे पत्र दिले. तटकरे यांच्या दिशेने पत्तेही फेकले. त्यानंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी l छावा संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा राजीनामा घेतला. मात्र केवळ त्यांचा राजीनामा घेऊन आम्ही शांत बसणार नाही तर शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्याने असंवेदनशील बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या कृषिमंत्र्यांनाही घरी पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे पक्षात याविषयी गंभीर चर्चा सुरू झाली आहे.