विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे. ( Kunal Kamra refuses to come to Mumbai demands to record his statement through video conferencing)
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलने स्वागत करू असा इशाराही त्याला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कुणाल कामरा याने ही मागणी केली आहे.
कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. तेथे त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत संपत असल्याने कुणाल कामरा याने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून मुंबई पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर र रद्द करण्याची मागणी केली आहे. आपल्यावर करण्यात आलेली कारवाई संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), १९ (१) (जी) (कोणताही व्यवसाय आणि व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत हमी दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आतापर्यंत तीन समन्स बजावले आहेत. मात्र, पोलिसांनी तीन समन्स बजावूनही तो मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. तसेच मुंबई पोलीस कुणाल कामराच्या चौकशीसाठी त्याच्या मुंबईतील घरी देखील गेले होते. यानंतर कुणाल कामराने एक सूचक पोस्ट शेअर केली होती. “गेल्या १० वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कुणाल कामराने म्हटलं होतं.
शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी 24 मार्च रोजी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका शोमध्ये कुणाल कामरानमे एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गातं त्यांना ‘गद्दार’ म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा याने पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले, मात्र सध्या तो मुंबईत नाही. आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही, या भूमिकेवरही तो ठाम आहे.