विशेष प्रतिनिधी
पुणे : तुमच्या मुलाचा संस्थेतील एका कर्मचारी महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ असल्याची धमकी देऊन शिक्षण संस्थाचालकाला ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ( Blackmailing an educational institution director by threatening to have a pornographic video of his child, extortion case against an impersonating journalist)
पुणे शहरात सिंहगड रस्ता परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थाचालकाला धमकावून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिक्षण संस्थाचालकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील नन्हे भागात शिक्षण संस्था आहे. तक्रारदार शिक्षण संस्थाचालक सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. आरोपी ६ मार्च रोजी शिक्षण संस्थेच्या आवारात आला. त्याने शिक्षण संस्थाचालकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ‘तुमचा मुलगा आणि एका कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रफीत माझ्याकडे आहे. संबंधित चित्रफीत प्रसारित करणार आहोत. संबंधित वृत्त प्रसारित न करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल,’ अशी धमकी देणारा संदेश त्याने शिक्षण संस्थाचालकांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला. त्यानंतर तो शिक्षण संस्थाचालकांना समक्ष भेटला. खंडणी देण्यासाठी त्यांना धमकावले. शिक्षण संस्थाचालकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.