विशेष प्रतिनिधी | पटना :
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मोठ्या मुलगा तेज प्रताप यादव याची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी केली आहे. सोशल मीडियावर तेज प्रताप यांचे अनुष्का यादवसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ( Lalu Prasad Yadav expelled his eldest son from the party the decision was taken after Tej Pratap Yadavs photo with a woman went viral)
लालू यादव यांनी २५ मे रोजी ‘X’ (ट्विटर) वर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत म्हटले की, “वैयक्तिक जीवनातील नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीची आपली सामूहिक लढाई कमकुवत होते. तेज प्रताप यांचे वर्तन, सार्वजनिक आचरण व जबाबदारीची भावना आमच्या कुटुंबीय व सामाजिक मूल्यांशी सुसंगत नाही. त्यामुळे मी त्यांना राष्ट्रीय जनता दल पक्षातून सहा वर्षांसाठी व कुटुंबातून कायमस्वरूपी बाहेर करत आहे.”
तेज प्रताप यांचे धाकटे भाऊ आणि पक्षातील प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनीही आपल्या वडिलांच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “वैयक्तिक जीवन वेगळं आहे, पण राजकारणात वर्तनाचे महत्त्व अधिक आहे. माझा भाऊ आपले वैयक्तिक निर्णय घेऊ शकतो, परंतु अशा कृती राजकीय जीवनात सहन करता येणार नाहीत. आम्ही बिहारच्या जनतेसाठी काम करत आहोत. या सर्व बाबतीत आम्हाला माध्यमांतूनच माहिती मिळाली. पक्षप्रमुख जे म्हणाले, ते आमच्यासाठी अंतिम आहे.”
लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनीही वडिलांच्या निर्णयाचं समर्थन करत भावावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी X वर लिहिलं, “कुटुंब, परंपरा आणि प्रतिष्ठेची जपणूक करणाऱ्यांवर प्रश्नचचिन्ह उभं राहत नाही. पण वारंवार मर्यादा ओलांडून प्रतिष्ठेला गालबोट लावणाऱ्यांना टीकेला सामोरं जावंच लागतं. आमच्यासाठी वडील हे देवासारखे आहेत, कुटुंब मंदिर आहे आणि पक्ष व सामाजिक न्याय ही आमची पूजा. यामध्ये कुणीही कलंक लावला तर आम्ही ते कधीच स्वीकारणार नाही.”
हा वाद २४ मे रोजी तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक पोस्टमुळे सुरू झाला. त्यांनी अनुष्का यादवसोबत १२ वर्षांच्या प्रेमसंबंधांचा खुलासा करत एक फोटोही पोस्ट केला होता. काही तासांनंतर त्यांनी पोस्ट डिलीट केला व X वर स्पष्टीकरण दिलं की, “फेसबुक अकाउंट हॅक झाला होता आणि तो फोटो AI-निर्मित होती.” मात्र, तोपर्यंत सोशल मीडियावर त्यांचे अनुष्का यांच्या सोबतचे करवा चौथ साजरे करतानाचे फोटो, साडी व कुंकू घातलेली तिची छायाचित्रे, आणि एक कथित विवाह समारंभाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
या प्रकरणामुळे आरजेडी पक्षात आणि यादव कुटुंबात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक राजकीय विरोधकांनी देखील या घटनेवर टीका करत यादव कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आणल्याचा आरोप केला.