लातूर जिल्हा बालकल्याण समितीला ‘विभागीय बालस्नेही पुरस्कार’
आझम पठाण
लातूर: लातूर जिल्ह्यातील बालकल्याण समिती (CWC Latur) यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे राज्य बाल हक्क आयोग आणि महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या ‘संभाजीनगर विभागीय बालस्नेही पुरस्कार’ वर आपली मोहोर उमटवली आहे.( Latur District Child Welfare Committee receives ‘Departmental Child Friendly Award’)
उत्कृष्ट बालकल्याण समिती या प्रकारात मिळालेल्या या सन्मानाने लातूर जिल्ह्याने संपूर्ण संभाजीनगर विभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनाथ, बेघर आणि संकटग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी समितीने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बालहक्क संवर्धनाच्या दिशेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. लातूर बालकल्याण समितीच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. हा सन्मान लातूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे!