विशेष प्रतिनिधी
पुणे : रायगडवरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवून देणार नाही. संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्वयाप चालू केला आहे, त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे, असा इशारा धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ( Laxman Hake warns that the sculpture of the Waghya dog at Raigad will not be removed)
ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. याबद्दलचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. याला विराेध करण्यासाठी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके कोर्टात जाऊ पण रायगडवरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही, असा इशारा दिला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, संभाजी भोसलेंना विकास आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष बनवलं आहे. त्यांनी रायगड किल्ल्याचे सरंक्षण करण्याऐवजी नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेली आहे. संभाजी महाराजांनी ३१ मे ही तारीख का निवडली. ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकोत्तर म्हणजे ३०० वी जयंती महाराष्ट्र साजरा करत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या गावी पंतप्रधान मोदींना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो खूप मोठा कार्यक्रम आहे. त्याआधी संभाजी भोसलेंनी ३१ तारखेचा अल्टिमेटम का दिला?
विशालगडाप्रमाणेच वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्लॅन संभाजीराजे भोसलेंचा आहे. २०१२ ला संभाजी ब्रिगेडने हा वाघ्याचा पुतळा जरी फेकलेला होता, तरी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तो पुतळा आहे त्या ठिकाणी बसवलेला होता. परत एकदा संभाजी ब्रिगेड, संभाजी भोसले यांनी महाराष्ट्रात जो काही उपद्वयाप चालू केला आहे, त्याला धनगर समाजाचा पूर्णपणे विरोध आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
“रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी करत लक्ष्मण हाके म्हणाले, त्यांनी विशालगडाची नासधूस केली आहे. आता वाघ्या कुत्र्याचे नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर ३१ मेच्या आधी जर असं काही घडलं तर तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज त्याला विरोध असेल. आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र लिहू, कोर्टात जाऊ पण रायगडवरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही. पुरातत्व खात्यालाच याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, २०१२ मध्ये वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडने काढून दरीत फेकला होता. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या आर. आर. पाटील यांनी तो पुतळा आहे त्या ठिकाणी परत बसवला होता. आता संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेड यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला आमचा विरोध आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसली होती, महात्मा ज्योतिराव फुलेही अध्यक्ष होते. तृतीय तुकोजीराव होळकर यांनी त्या समाधीसाठी आर्थिक मदत केली होती. छत्रपती शिवाजी मिलेट्री स्कूल या समोर जो पुतळा बांधला गेला त्यालाही होळकरांनी मदत केली होती. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ही जी त्यावेळची मंडळी होती त्यांच्याबाबत आणि त्यावेळच्या स्मारक समितीबाबत संभाजीराजे आणि काही इतिहासकारांना शंका आहे का? या सगळ्यांनी ज्या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला ती भावना महत्त्वाची आहे.