पुणे : मनोज्ञ जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत. जरांगे पाटील वाळू माफियांच्या आधारावर आंदोलन करत असून, यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचा गंभीर धोका आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ,वाळू माफियांचा आधार घेत आंदोलन घडवले जात असेल, तर हे घातक आहे, असेही ते म्हणाले.
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. वाळू माफियांना संरक्षण देण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते का? असा सवाल त्यांनी केला.
हाके म्हणाले, ओबीसी समाजाचा मराठा समाजाला विरोध नाही, पण आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होऊ नये, ही आमची न्याय मागणी आहे. ओबीसी समाजाने नेहमीच आपले हक्क टिकवण्यासाठी लढा दिला आहे आणि यापुढेही तो लढा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.आठवड्यातून दोन दिवस उपोषण करून सर्व प्रश्नांवर बोलावे. प्रत्येक पंधरा दिवसांनी उपोषणाचा फार्स कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
हाके यांनी आरोप केला की, बीड आणि पुण्यातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला करणारे गेवराई तालुक्यातील होते. त्यांनी तीन-चार दिवस रेकी करून हल्ला केला. पोलिसांकडे या सर्व माहिती असून, केवळ तडीपार कारवाई पुरेशी नाही. त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा.”
भाजप नेते सुरेश धस यांच्यावर टीका करताना हाके म्हणाले, “सुरेश धस यांना ओबीसींची मते हवी असतात, पण तेच विजयी सभेत धनगर समाजाच्या मतांचे कौतुक करतात आणि नंतर त्यांच्याविरोधात गरळ ओकतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.
महाराष्ट्रात ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष असण्याची गरज आहे. यामुळे ओबीसी समाजाची बाजू प्रभावीपणे मांडता येईल आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महामानवांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत, हाके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “त्यांना शॉक ट्रीटमेंट द्यावी आणि वेड्यांच्या रुग्णालयात भरती करावे,” असे ते म्हणाले.