विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोन ठाकरे बंधूंची युती झाली तर अभिनंदन आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊच दे.. जोपर्यंत हे एक होणार नाहीत, तोपर्यंत त्यांची ताकद कळणार नाही, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी दिले. (Let it be decided once Prasad Lads challenge to the Raj-Uddhav Thackeray alliance)
हिंदी सक्तीच्या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाके आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झालेल्या संयुक्त मेळाव्यावर बोलताना लाड म्हणले, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा अपमान उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून करण्यात आला. ते मनसेचे नेते विरसले का? उद्धव ठाकरे हे आज सन्माननीय राज ठाकरे म्हणत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना गरज लागते तेव्हा ते हात पकडतात. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा हात तर राहूल गांधी यांचे पाय पकडले. आज ते राज ठाकरे यांचा हात पकडू इच्छितात. राज ठाकरेंचा हात पकडताना काँग्रेस कुठे आहे, याचा विचार करत नाही. काँग्रेसने मुस्लीम मते ठाकरेंकडे दिली. आज तीच काँग्रेसची मते पळवून उद्धव ठाकरे राजकारण करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण हीन दर्जाचं आहे, हे आपल्या लक्षात येईल.
“निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा बाऊ केला जातोय. ‘म’ मराठीचा नाहीतर महानगरपालिकेचा आहे. हा प्रकार कुठेतरी उद्धव ठाकरेंनी थांबवला पाहिजे. राज ठाकरेंबद्दल त्यांची भूमिका जनतेत सांगितली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एकतरी भूमिका मराठीबद्दल बोलून दाखवली का? हे सांगा. गद्दार, खंजिरच्या पलीकडे ते बोलले. यामुळे राज ठाकरे सुद्धा अचंबित झाले होते,” असा दावाही लाड यांनी केला.
राज्यात हिंदी सक्तीचे पाप उद्धव ठाकरे यांचेच आहे या आरोपाचा पुनरुच्चार करताना लाड म्हणाले, हिंदी भाषेचा जीआर उद्धव ठाकरेंनी काढला होता. माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या हातात दिला होता. ते किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते, हे लोकांच्या समोर येईल.