विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनमध्ये 40°c तापमानाची नोंद आहे तर शहरातील कोरेगाव पार्क परिसरात देखील 40°c तापमान आहे. ( Maharashtra heats up, Pune records 40°C temperature)
काल अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानाने 41 अंशापर्यंत पोहोचणार असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून वाचण्यासाठी पुणकेरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईमधील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या एक – दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे. या कालावधीत तापमानात वाढ होण्याची शक्यता नसली तरी उष्ण व दमट वातावरणामुळे बैचेन होईल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.