विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देणे हा या दलाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
( Maharashtra Tourism Security Force to be formed for the safety of tourists)
पर्यटन स्थळांवरील सुरक्षितता, स्थानिक वारसा आणि कायद्याची माहिती देण्यासाठी कंत्राटी तत्वावर ‘पर्यटन पोलीस’ नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सुरक्षा मंडळ आणि मेस्को यांना त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
या दलाची प्रायोगिक सुरुवात १ ते ४ मे २०२५ दरम्यान महाबळेश्वर महोत्सवात होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या २५ जवानांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. हे जवान २५ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कार्यरत राहतील. आवश्यक वाहन व्यवस्था आणि सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पर्यटकांसाठी हेल्पलाइन, माहिती केंद्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेवा दिली जाईल. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा अधिक बळकट केली जाईल. आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा त्वरित प्रतिसाद देईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी भक्कमपणे उभा राहील. राज्यात एकूण १ लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि १८ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.