विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 12 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. ( Major train accident in Mumbai 12 passengers from Pushpak Express fall on tracks five die)
मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते..
ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
पुष्पक एक्स्प्रेस मुंबई ते लखनौदरम्यान धावते. सीएसएमटीवरुन सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. पुष्पक एक्स्प्रेसचा पुढचा थांबा कल्याण रेल्वे स्थानक होता. मात्र दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यावर हे प्रवासी रेल्वेतून पडले.
पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.