विशेष प्रतिनिधी
बीड : पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश आणि त्रासदायक कॉल पाठवण्याच्या आरोपाखाली अमोल काळे (वय 25) याला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली. काळे हा पुण्यात रहात असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून विद्यार्थी आहे .( Man arrested for sending obscene messages to Minister Pankaja Munde)
या प्रकरणी निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. भामरे हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला.
आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी संशयिताचे स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळे (25) या आरोपीला ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले. त्यानंतर, अमोल काळे याला बीएनएनएस कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली, मुंबईत आणण्यात आले आणि औपचारिकरित्या अटक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.