विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली ; देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाषिक आणि प्रांतीय एकतेचा जो भाईचारा आहे, तो मोडण्याचा प्रयत्न करणारा हा एक ‘प्राणी’ आहे. राज ठाकरेला कोणीही काहीही बोलू दे, पण जे राजकारणाच्या कचराकुंडीत गेले आहेत, त्यांना पुन्हा उचलण्याचा प्रयत्न कुणी करू नये, हीच प्रार्थना, अशी जहरी टीका भाजपचे खासदार आणि भोजपुरी गायक नट मनोज तिवारी यांनी केली आहे. ( Manoj Tiwaris venomous criticism of Raj Thackerayan attempt to break brotherhood is in the dustbin of politics)
हिंदी भाषेच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना मनोज तिवारी म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांच्या सारखे लोक मराठी संस्कृतीचा केवळ दिखावा करतात. मात्र भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या अस्मितेचे जतन करते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरे यांना स्वीकारत नाही. जे त्यांच्या सोबत जातील, ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून संपतील.
राज ठाकरे यांनी हिंदी भाषेला विरोध सुरू केल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे हिंदी पत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजपचे दुसरे खासदार निशिकांत दुबे यांनी तर महाराष्ट्राबाहेर आला तर तुम्हा दोघा ठाकरे बंधूंना लोक पटक पटक के मारेंगे असा इशारा दिला होता. त्यावर दुबेंना प्रतिआव्हान देत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. हिंदी सक्तीचा विरोध आणि मीरा-भाईंदर येथील मनसेच्या आंदोलनानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली.