मराठा आरक्षण चळवळीला मोठे यश ! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण यशस्वी – हैद्राबाद गॅझेट लागू, आंदोलकांवरील गुन्हे ७ दिवसात आणि सातारा गॅझेट १ महिन्यात लागू ( Maratha Reservation Movement a Big Success! Manoj Jarange Patil’s Fast Ends Victorious – Hyderabad Gazette to Be Implemented, Cases Against Protesters Withdrawn Within 7 Days, Satara Gazette in 1 Month )
मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या चर्चेत राज्य सरकारच्या उपसमितीने मराठा आरक्षण चळवळीला मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून आंदोलकांना महत्त्वाची आश्वासने देण्यात आली आहेत.
मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात काही गैरसमज आहेत, मात्र हे गैरसमज निराधार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये असलेल्या कायदेशीर गुंतागुंतीची माहिती आम्ही त्यांना स्पष्टपणे दिली आहे. मराठा समाजाच्या हिताचा विचार करून तोडगा निघाला असून, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले
हैद्राबाद गॅझेट लागू
सरकारने हैद्राबाद गॅझेटियरला तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना मराठा आरक्षणाशी संबंधित लाभ मिळणार आहेत.
सातारा गॅझेट लवकरच
पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा गॅझेट लागू करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असून, पुढील महिनाभरात या संदर्भात कार्यवाही होईल.
आंदोलकांवरील गुन्हे मागे
आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरातील आंदोलकांवर दाखल झालेल्या सर्व केसेस सप्टेंबरअखेरीस मागे घेण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे.
बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी
आंदोलनात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत आणि राज्य परिवहन महामंडळात नोकरी दिली जाणार आहे. उर्वरित रक्कम आठवड्याभरात त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
ग्रामपंचायतीत नोंदी उपलब्ध
राज्यातील तब्बल 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारकडून दिले जाणार आहेत, जेणेकरून नागरिकांना अर्ज करताना अडचणी येणार नाहीत.
काही मागण्यांसाठी अधिक वेळ
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ घेण्यात येणार आहे, तर सगेसोयऱ्यांच्या संदर्भातील आठ लाख हरकतींचे निराकरण करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.