विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऋषितुल्य भैय्याजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले. मुंबईत भाषेची सक्ती करता येणार नाही. मराठी बोल म्हणून तुम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. मुंबईची कोणती एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. मुंबई प्रत्येकाला प्रत्येक भाषा बोलण्याचा अधिकार आहे, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांचे समर्थन केले आहे. ( Marathi cannot be forced into speaking, Gunaratna Sadavarte supports Bhaiyaji Joshi)
मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे विधान माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यावर सदावर्ते म्हणाले, भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. त्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. या देशाला एकसंघ ठेवायचं असेल, या देशाला प्रांतवादापासून दूर ठेवायचं असेल, या देशाला भाषा भाषांवरील लढाईपासून थांबवायचं असेल, या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल तर मला असं वाटतंय की भाषा ही समजण्यासाठीचा आग्रह असावा. भाषा हा सक्तीचा आग्रह नसावा. भाषा ही जुलमी पद्धतीने लादली जाणारी नसावी. भाषा ही समजण्याच्या आणि समजून घेण्यासाठीची असावी. भाषा ही इशाऱ्याची असते. भाषा बोलीभाषेची असते. मराठीत सांगायचे झालं तर आमच्या विदर्भाची वऱ्हाडी मराठी भाषा आहे, मराठवाड्यातील मराठी आहे, कोकणातील कोकणी आहे, मराठी आहे. महाराष्ट्रात वेगवेगळे प्रांत आहेत. पण भाषेची जननी एकच आहे. हे टीकाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे.
आदित्य ठाकरेच्या बाजूला उभं राहून ठाकरे गटाचा आमदार लुडबुड केल्यासारखे वक्तव्य करत होता. मला त्याची कीव येत होती. तुम्हाला भाषेची जननी माहितीये का, भाषेची माता कोण, हे तुम्हाला माहिती आहे का, असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
“भैय्याजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते भारतीय संविधानाची भाषा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे. एखादा गुजराती गुजरातीत बोलू शकेल, मराठी भाषिक मराठीत बोलू शकेल, उत्तर भारतीय असेल तर तो भोजपुरीत बोलू शकेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. हेच या देशाचे सौंदर्य आहे. हेच भारतीय संविधानाचे सौंदर्य आहे. इस्लामिक शासकाप्रमाणे जोर जबरदस्ती या देशात चालत नाही. भैय्याजी जोशी हे ऋषीतुल्य आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येकाने या वक्तव्याचे स्वागत करायला हवं”, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.”
“गुजराती, भोजपुरी, हिंदी या सर्वांच्या भाषा आहेत. जे नेते टीका करत आहेत त्यांनी सांगा व त्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमाच्या शाळेत झालं. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना महापालिकेसाठी लोकांना उत्तेजित करायचा आहे”, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.