विशेष प्रतिनिधी
पनवेल : वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या पेठाळी गावातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. केवळ घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा, या कारणांमुळे एका तरुण विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाला. अखेर सोनम केणी या विवाहितेने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ( Married woman commits suicide after killing five-year-old daughter due to unbearable harassment by in-laws)
सोनम केणी (पूर्वाश्रमीची सोनम पाटील) हिचा विवाह 2018 साली पेणधर गावातून पेठाळीतील अभिषेक केणी याच्याशी झाला होता. 2020 साली पहिली मुलगी झाल्यानंतर सासरच्यांकडून दुसऱ्या अपत्यासाठी मुलगाच व्हावा म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे तगादा लावण्यात आला. भोंदू बाबांची उपाययोजना, डॉक्टरकडील उपचार, भगत यांच्या मदतीने मुलगा होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मात्र 2024 मध्ये पुन्हा एक मुलगीच झाल्यानंतर सोनमवर टोमणे मारणे, पैशांची मागणी, आणि मानसिक छळ सुरु झाला. घर बांधणीसाठी 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. दुसऱ्या मुलीचा दोन महिन्यांतच संशयास्पद मृत्यू झाला. यानंतरही सासरच्यांनी लगेचच पुन्हा अपत्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
या सर्व प्रकारांना कंटाळून आणि वाढदिवशीच असह्य झालेल्या मानसिक यातनांमुळे सोनमने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. तिने 8 पानी सुसाइड नोट लिहून सासरच्यांनी केलेल्या छळाची माहिती दिली. सोनमच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा ठपका ठेवत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महिन्याभरानंतरही आरोपी फरारच असून पोलिसांकडून अटक न झाल्याने संतप्त कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी सध्या उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोनमच्या नातेवाईकांनी “ही आत्महत्या नव्हे तर नियोजित हत्या आहे; आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे,” असा दावा केला आहे.