विशेष प्रतिनिधी
पुणे : नाना पिढीतील लाकडी वाड्याला भीषण आग लागून संपूर्ण वाडा जळून खाक झाला. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही. ( Massive fire breaks out in threestorey wooden house in Nana Peth)
अग्निशमन दराने दिलेल्या माहितीनुसार,
आज रात्री वाजता नाना पेठ, राम मंदिराजवळ, पारेख वाड्याला आग लागल्याची माहिती मिळताच दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहिले. अतिरिक्त मदत मागवण्यात आली असता अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.
जवानांनी वाड्याच्या तीन ही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी करुन पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. वाड्यात कोणी राहत नसल्याची खात्री करत कोणी जखमी नसल्याची खातरजमा केली. धूर मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी असलेल्या रहिवाशी इमारती मधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले. घरामधील सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका टाळला. आग इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले आहे.
हा पुर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद व काम सुरु असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता.
अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी व किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन केले.