विशेष प्रतिनिधी
पुणे : बोलण्याच्या ओघात काही बोलून गेल्यावर त्याचा फटका बसण्याचे प्रसंग अजित पवार यांना अनेकदा भोगावे लागले आहेत. मात्र आज माध्यमांनी ध चा मा केल्याने त्यांना चांगलेच ट्रोल झाले. ( Media trolls Ajit Pawar on Dhirubhai Ambani ststement)
रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केल्याची बातमी माध्यमांमध्ये देण्यात आली. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये त्या म्हणतात, ‘धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही?’ असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार धीरूभाई अंबानी यांना चोर म्हणाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. अजित पवार ‘चोरून’ नव्हे तर ‘सोडून’ म्हणाले, असे ते म्हणालेत.
माध्यमांनी आपल्या बातमीत म्हटले आहे की, अजित पवार आपल्या व्हिडिओत म्हणतात, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पेट्रोल चिरून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे.
वास्तविक अजित पवार चोरून नव्हे तर सोडून असे म्हणाल्याचे या व्हिडिओत ऐकू येत आहे. पण त्याचा ध चा मा करण्यात आला.