विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : धर्मादाय रुग्णालयांना शासनाच्या विविध सवलती मिळतात, त्यांच्यावर कोणतेही कर नाहीत, तरीही ते गरिबांची सेवा करत नाहीत. त्यामुळे या रुग्णालयांविषयी जनतेत रोष वाढतोय, असा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुण्यातील संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत रुग्णालयांनी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ तातडीने लागू करावी, अशी मागणी केली आहे. ( Medical Education Minister Hasan Mushrif accuses charitable hospitals of not providing services to the poor despite receiving government concessions)
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेच्या मृत्यूच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित करत मुश्रीफ म्हणाले:”मीच समिती नेमणार आणि मीच चौकशी करणार, तर दोषी कसा ठरवणार? जर त्या महिलेला तात्काळ उपचार मिळाले असते, तर काय झालं असतं? अशा संस्थांनी मानवी दृष्टिकोन ठेवायला हवा.”
मुंबईतील बहुतेक रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजना राबवली जात नाही. त्याचबरोबर, काही रुग्णालये महात्मा फुले योजनाही राबवत नाहीत. आता या दोन्ही योजना एकत्र केल्या आहेत कारण अनेकदा लोक दोन्ही योजनांचा लाभ घेताना आढळले, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने तनिषा भिसे नावाच्या महिलेला पैशांअभावी उपाचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. नंतर दुसऱ्या रूग्णालयात दाखल केल्यावर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. सर्व पक्षांनी आंदोलने केली आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची चौकशी करतानाच राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या बाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासाठी चौकशी समिती ही गठीत करण्यात आली आहे.