विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरून त्याला अटक केल्याचेकरण्यात आली. ( Mehul Choksi arrested for defrauding Punjab National Bank of Rs 13500 crore)
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) विनंतीवरुन अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यालाही भारतात आणले जाणार आहे. हिरे व्यापारी असलेल्या मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 13500 कोटींचा कर्ज घोटाळा केला होता. अटक टाळण्यासाठी त्याने देशाच्या बाहेर पळ काढला होता.
मेहुल चोक्सी हा त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत बेल्जियममधील अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ असल्याचे आणि तो उपचारांसाठी अँटिग्वाहून बेल्जियममध्ये आल्याचे अनेक अहवालांमध्ये उघड झाले आहे. मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला असल्याचे समोर आले आहे. अहवालात म्हटले आहे की, हे वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते. मेहुल चोक्सीला कर्करोग झालाआहे. त्यामुळे अटकेपासून सुटका व्हावी यासाठी तो तेथील न्यायालयात अर्ज करू शकतो.
मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. त्यांनी या बँकेत 13,500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग (LOU) फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे. मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेने सुरू केली आहे. जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी करणे शक्य होईल. तसेच, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.