विशेष प्रतिनिधी
नागपूर : आपले पंचांग जे जगामध्ये सर्वात प्राचीन आहे, त्या पंचांगांचा पायाही वैदिक गणितावरच आधारित आहे. त्यामुळे राज्यात वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ( Merit center based on Vedic mathematics will be started, informed by Chief Minister)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांच्याद्वारे प्रणित ‘वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स’ आणि ‘वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक’ या 2 पुस्तकांचे प्रकाशन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुस्तकामुळे आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेची महत्वाची कडी असणाऱ्या वैदिक गणिताची महती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी 16 सूत्र आणि 13 उपसूत्रांद्वारे या पुस्तकात वैदिक गणिताची मांडणी केली, ज्याद्वारे अवघडातले अवघड गणितही सोप्या पद्धतीने सोडविले जाऊ शकते. महान शंकराचार्यांच्या परंपरेतील भारती कृष्ण तीर्थ महाराज हे पहिले शंकराचार्य आहेत, ज्यांनी परदेशात जाऊन भारतीय संस्कृती, ज्ञान व विज्ञान यावर व्याख्याने दिली. जगदगुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेदांच्या ऋचांमधून गणित सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, भारतावर झालेल्या विविध परकीय आक्रमणामुळे आपल्या गौरवशाली परंपरा व उत्तम लिखाणाचे जतन आपण करू शकलो नाही. आता वैदिक गणिताच्या या पुस्तकांच्या माध्यमातून ही गौरवशाली परंपरा पुन्हा समाजासमोर येत आहे. आपले पंचांग जे जगामध्ये सर्वात प्राचीन आहे, त्या पंचांगांचा पायाही वैदिक गणितावरच आधारित आहे. भारती विद्या कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणित आधारित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकार मदत करेल. तसेच या ज्ञानाचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा त्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करेल.