विशेष प्रतिनिधी
पुणे: आईवडिलांशी झालेल्या भांडणाच्या रागातून १६ वर्षीय मुलगी हिंगोलीतून पुण्यात निघून आली. त्यानंतर ही मुलगी बुधवार पेठतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली. एका पोलीस मित्राने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी या मुलीला विश्वासात घेऊन सुखरूप आईवडिलांकडे सुपूर्द केले. (Missing girl from Hingoli found in Budhwar Peth Pune police safely returned her to her parents)
मंगळवारी (८ जुलै) फरासखाना पोलिसांचे पथक छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर गस्त घालत होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर एक मुलगी संशयास्पदरित्या फिरत होती. एका पोलीस मित्राने या मुलीला बघितले. ही मुलगी भेदरलेली होती. पोलीस मित्राने याबाबतची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. मुलीची विचारपूस केली. मुलगी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा गावातीाल असल्याची माहिती मिळाली. आई-वडिलांशी किरकोळ वाद झाला होता. राग आल्याने ती पुण्यात निघून आल्याची तिने चौकशीत पोलिसांना सांगितले.
दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी हिंगोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भस्मे यांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी पुण्यात सापडली असून, ती सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर हिंगोली पोलिसांचे पथक पुण्यात पोहाेचले. बुधवारी तिला हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले की,
श्रीदत्तमंदिर परिसरात विमनस्क अवस्थेत फिरत असलेल्या या मुलीबाबत एका पोलीस मित्राने माहिती दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिला सुखरूप हिंगोली पोलीस आणि मुलीचे आईवडील तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहयक निरीक्षक उत्तम नामवाडे, पोलीस अंमलदार वैभव गायकवाड, गजानन सोनुने, रेखा राऊत, सारीका गुंजाळ, अनिता साबळे, मनिषा पुकाळे, अर्चना ढवळे, सोनाली भालेराव, पोलीस मित्र तेजश्री कुपरे, प्रसाद बनसोडे आणि कार्तिक घोडेकर यांनी ही कामगिरी केली.