विशेष प्रतिनिधी
सोलापूर : स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याणशेट्टी यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेऊनमारहाण करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा नातू अभिनेता वीर पहारिया यांच्यावर जोक केल्याने मुंबईतील स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण केली. सोलापुरातील एका शो दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्याने सोलापुरातील त्याच्या फॅन्सकडून मारहाण झाल्याचा दावा,प्रणित मोरे याने केला आहे. वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याचा नुकताच स्काय फोर्स हा चित्रपट रिलीज झाला असून, या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवली आहे. प्रणित मोरे याने केलेल्या दाव्यानुसार 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टॅन्डअप शो झाला. या शो नंतर 11-12 लोकांचा एक गट फोटोसाठी विनंती करतं पुढे आला. त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली.
याचा निषेध करताना कल्याणशेट्टी म्हणाले, सोलापूर हे कलाकाराला दाद देणारे शहर आहे. त्या कलाकाराशी मतभेद असतील तर त्याबाबत पोलिसात जाणे अपेक्षित आहे. भारतीय राज्य घटनेने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि फ्रीडम ऑफ स्पीचचा सर्वांना अधिकार दिला आहे. सध्या काँग्रेसवाले हे लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा बाऊ करतायत. यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा हात आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांचा यात नक्की हात आहे. त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस नेत्यांनी ही थांबू नये. उलट पोलिसात जाऊन अशा लोकांवर कारवाई करण्याची त्यांनी ही मागणी करावी .
कल्याणशेट्टी म्हणाले, काँग्रेसचे नेते हे जर खऱ्या अर्थाने मराठी कलाकारांच्या बाजूने असतील तर अशा चेल्या चपाट्यांना पाठीशी घालणे थांबवावे. तनवीर शेख हा यामध्ये आरोपी आहे,तो सुशीलकुमार शिंदे यांचा पीए आहे की नाही याबाबत माहिती नाहीय. तो कोणाचाही पीए असो किंवा कोणाच्या ही जवळचा असो. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा किंवा खासदार प्रणिती शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहेत असे समजत आहे.त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी त्यांनी ही राहू नयेयामधील 5 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बाकीच्या 3 आरोपीना पोलिसी खाक्या दाखवून ताब्यात घ्यावं. त्यामुळे पुन्हा अशा लोकांची अशा गोष्टी करण्याची मस्ती होता काम नये.