विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंदुत्ववादी भूमिकांमुळे चर्चेत आलेले आमदार जगताप सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर ही धमकी मिळाल्यामुळे पोलिस प्रशासनालाही सतर्क करण्यात आले आहे. (MLA Sangram Jagtap receives death threat Security increased after controversial statements)
२ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ हे मार्केट यार्ड चौकात असताना त्यांना अज्ञात क्रमांकावरून एक धमकीचा मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये थेट इशारा देत लिहिण्यात आलं होतं की, “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा”.
शिरसाठ यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मेसेजचा स्त्रोत, फोन नंबर आणि इतर तांत्रिक पुरावे मिळवण्यासाठी सायबर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांनी औरंगजेबविरोधी केलेल्या विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एका सभेत म्हटले होते की, “औरंगजेब भारतातला नव्हता, त्याची वंशावळ परकीय होती. जो मुस्लिम भारतात आणि महाराष्ट्रात राहतो, त्याने औरंगजेबाच्या विचारसरणीशी सहमत असू नये. जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात, ते भारतीय मुस्लिम असू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या डीएनए टेस्टची गरज आहे.”
या विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचे समर्थनही केले. काही समाजघटकांनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत निषेध केला होता.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाकडून आमदार जगताप यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.