विशेष प्रतिनिधी
मुंबई : संघर्ष होईल,असे मार्ग आंदोलक मागत होते.त्यांना वेगळी कारवाई करायची होती. त्यामुळेच मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (MNS sought a way to hold a struggle Chief Minister explained the reason for denying permission for the march)
मीरा भाईंदर येथे उत्तर भारतीय हिंदी भाषिकांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. याला उत्तर म्हणून मनसेच्या वतीने देखील मंगळवारी मीरा भाईंदर येथे मोर्चाचं आयोजन केले होतं. पण, मोर्चाला परवानगी नाकारत मनसेच्या अनेक नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पोलीस आयुक्तांना विचारले की, परवानगी का दिली नाही? त्यांनी सांगितलं की, मनसेच्या नेत्यांची मोर्च्याच्या मार्गासंबंधात चर्चा सुरू होती. परंतु, जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा मार्ग मागितला जात होता. पोलिसांचं मत असेही होते की, काही लोकांसंदर्भात अशी माहिती आली होती की, त्यांना काही वेगळी कारवाई करायची आहे. त्यामुळे पोलिसांनी सांगितले होतं की, जो नेहमीचा मार्ग आहे, तो मार्ग तुम्ही घ्या… मात्र, मनसेच्या नेत्यांनी हाच मार्ग घेणार, असा हट्ट धरला. त्यामुळे परवानगी नाकारली, असे मला आयुक्तांनी सांगितले.
“मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल. मात्र, तुमच्या रितीने मार्ग ठरवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. शेवटी आपल्याला सगळ्यांना राज्यात एकत्रित राहायचं आहे. राज्याच्या विकास करायचा आहे. त्यामुळे योग्य मार्ग मागून परवानगी मागितली तरी कधीही मिळेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी दिली, मग मनसेला का नाकारली? या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले, याचीही मी पोलिसांकडून माहिती घेतली. याबद्दल मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जो मार्ग दिला, त्यावर त्यांनी मोर्चा काढला. कुठलाही अधिकचा आग्रह केला नाही. परंतु, मनसेच्या नेत्यांनी मोक्याच्या रस्त्यावरून मोर्चाची मागणी केली. जिथे मोर्चा काढणे कठीण आहे. सभेची सुद्धा परवानगी मनसेच्या नेत्यांना दिली होती. आता इतके वर्षे आपण सगळेच मोर्चे काढतो. मोर्चे काढत असताना पोलिसांशी चर्चा करून मार्ग ठरवत असतो. ५ तारखेला होणाऱ्या मोर्च्यासंबंधात मार्ग ठरवण्यात आला होता. मोर्चा काढण्यास कुणालाही नाकारणार नाही. मात्र, पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था किंवा वाहतूक सांभाळणे कठीण असल्याने मार्ग बदलण्याची मागणी होती. पण, ती त्यांनी फेटाळली.