विशेष प्रतिनिधी
पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात नागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. उद्या बुधवारी म्हणजेच ७ मे रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा सराव मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.
( Mock drills will be held in 16 districts and 75 locations in Pune amid India-Pakistan tensions)
महाराष्ट्रात १६ जिल्ह्यांमध्ये हा सराव होणार असून पुणे शहरात तब्बल ७५ ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आणल्या असून गृह विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वांना सक्त सूचना दिल्या आहेत. सर्व मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातील प्रशासनाशी सतत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१९७१ साली भारत-पाक युद्धादरम्यान अशी मॉकड्रिल झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धजन्य सराव होत आहे. यामध्ये हवाई हल्ल्याचा सायरन, ब्लॅकआउट रिहर्सल, नागरी रक्षण उपाययोजना, प्राथमिक उपचारांची तजवीज, आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर यांचा समावेश असणार आहे.
सरावात सहभागी नागरिकांनी सायरन वाजल्यावर सर्वप्रथम घरातील लाइट्स बंद करावेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत, आणि सुरक्षित ठिकाणी जसे की इमारतींच्या तळमजल्यावर किंवा पार्किंगमध्ये – जमावं. जर प्रत्यक्षात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर घाबरून न जाता संयम बाळगावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या सरावात शाळा, कॉलेज, औद्योगिक वसाहती, रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या यंत्रणा व प्रशासकीय कार्यालये सहभागी होणार आहेत. हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांवर प्रतिक्रिया देण्याची तयारी, ब्लॅकआउट दरम्यान सुरक्षितता, प्राथमिक उपचार आणि शत्रूचा संभाव्य हल्ला झाल्यास काय करावं याचा सविस्तर अभ्यास मॉकड्रिलमध्ये होणार आहे.
राज्यातील मॉकड्रिलसाठी निवडलेली ठिकाणं पुढीलप्रमाणे:
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
दरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सलग ११ दिवस गोळीबार सुरू आहे. भारतानेही याला कडक प्रत्युत्तर दिलं असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने ही मॉकड्रिल राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मॉकड्रिल म्हणजे केवळ युद्धसराव नाही, तर एक सशक्त संदेश आहे — की भारत कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्यास पूर्णतः सज्ज आहे.