विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडे युद्धविरामाची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावर खास संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे. ( Modi government should provide information about ceasefire also shed light on Americas role question from Indian opposition)
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी शनिवारी म्हटलं, “वॉशिंग्टन डीसीमधून आलेल्या ‘अभूतपूर्व घोषणां’च्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे.”गेल्या १८ दिवसांतील घडामोडींवर विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या संघर्षावर आणि पुढील दिशेवर चर्चा करण्यासाठी संसदेत विशेष अधिवेशन घेणं गरजेचं आहे. यामुळे राष्ट्रीय ऐक्य आणि सामूहिक निर्धार दाखवता येईल.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) च्या पोलिटब्युरोने एका निवेदनाद्वारे युद्धविरामाच्या घोषणेला सकारात्मक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. “दोन्ही देशांच्या जनतेने पुरेसं दु:ख भोगलं आहे. त्यांना आता शांती आणि प्रगतीची संधी मिळावी हीच अपेक्षा आहे. दहशतवादाच्या विळख्यातून दोन्ही देशांनी मुक्त व्हावं, यासाठी पुढील पावले उचलावीत,” असं CPI(M) ने म्हटलं आहे.
विरोधकांच्या या मागण्यांमुळे सरकारकडून आगामी काळात संसदेत किंवा माध्यमांतून अधिक स्पष्ट माहिती दिली जाते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.