विशेष प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात घैसास हॉस्पिटलची भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी संतप्त झाल्या आहेत. ‘ कोणसोम्या, गोम्या’ असे म्हणत त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. ( MP Medha Kulkarni angry over vandalism of Ghaisas Hospital writes a letter to BJP city president and reprimands him)
अनामत रक्कम भरण्यास पैसे नसल्यामुळे एका महिलेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नव्हते. या महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात दोन जुळ्यांना जन्म देऊन मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी या महिलेला पैसे नाहीत तर ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या रुग्णालयाची तोडफोड केली.
यावर खासदार कुलकर्णी यांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून सुनावले आहे. कुलकर्णी यांनी दोन पानांचे पत्र रविवारी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पाठवले आहे. त्यामध्ये कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, ‘कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. तोडफोड करणे हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही.’
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आत्ता बोलत नाही कारण तो आपला विषय नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रति निष्ठा आहे, प्रेम आहे व आशीर्वाद आहे. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असे मला वाटते.
राजकीय व्यक्तींनी कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे व विनम्रतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते. नुकसान भरपाई व दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची व पक्षाची गरिमा वाढेल असेही मला वाटते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर दुरुस्त नमूद केले आहे. करणे हे आवश्यक आहे, असेही कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दावखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी हे योग्य नसल्याचे म्हटले होते.