विशेष प्रतिनिधी
पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे बुधवारपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
( MP Supriya Sule will sit on hunger strike)
याबाबत सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या अनास्थेला कंटाळून बुधवारी सकाळी १०:०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणास बसणार आहेत.
सुळे यांनी म्हटले आहे की, श्री क्षेत्र बनेश्वर, ता. भोर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाल्याचे मी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर ४ मार्च रोजी मी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु तत्पूर्वी ३ मार्च रोजी पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यांत हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द मला दिला होता. पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेली डेडलाईन उलटून गेली. परंतु अद्यापही तेथे रस्त्याचे कोणतेही काम पुर्ण झालेले नाही. प्रशासन अशा प्रकारे खोटं का बोलत आहे, हे अनाकलनीय आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, हा रस्ता भाविकांना ये जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दूरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो.
मुख्यमंत्री महोदयांना देखील ही बाब निदर्शनास आणून दिली होती. हा रस्ता भाविकांना ये जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दूरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. पण शासन व प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या अनास्थेला कंटाळून मी अखेर उद्या ९ तारखेला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला बसणार आहे, असे त्यांनी सांगितले.