विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. अचानक विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरु केल्यानं, इथली वाहतूक विस्कळीत झाली.पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. ( MPSC students stage sudden protest in Punearrested by police)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ, आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे नाराज झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवूनही गुणवत्तायादीत स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परीक्षा पुढे ढकलावी आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र गट ‘ब’च्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे ४४१ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले होते. राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आयोगाने मागणीपत्र राज्य सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पीएसआय’ पदांसाठी केवळ २१६ जागांसाठी जाहिरात काढली. राज्य सरकारने २२५ जागा का कमी केल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित करत पीएसआय पदांच्या संख्येमध्ये वाढ करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, तर केवळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. मात्र आयोगाच्या चुकीच्या कामकाजामुळे अभ्यास सोडून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रासारख्या मार्गदर्शक राज्यात विद्यार्थ्यांवर वारंवार आंदोलनाची वेळ येते, यामुळे आयोगाला अधिक जबाबदार आणि कार्यक्षम बनवणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि नियोजनबद्ध व्हाव्यात, आयोगामध्ये कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
पोलिसांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची समजूत घालण्यात येत आहे. मात्र विद्यार्थी काहीही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची परिस्थिती आहे. एकीकडे पोलिस समजूत घालत आहेत तर दुसरीकडे विद्यार्थी आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यावर म्हणाले,
अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
सरकारने आणि विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी.