पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी बस कंटेनरवर आदळून अपघात झाला. या अपघातात बसचालकासह १० प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात आले आहे. बसचालकाविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक सदानंद महादेव खोत (वय ३०, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वतेज अभिमन्यू जाधव (वय २३, रा. हडपसर) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन कोल्हापूरकडे निघाली होती. भुळवाडी परिसरात बसचालक खोत याचे नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरवर आदळली. अपघातात बसचालक खोत याच्यासह दहा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकासह प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस हवालदार पी. एन. कांबळे तपास करत आहेत.