विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अशी आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दिली. ( Mumbais original identity is that of the Marathi speaking peopleRaj Thackeray gave a reference to Dr. Babasaheb Ambedkars statement)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठिंबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.
राज ठाकरे म्हणतात, ‘बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.’
मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? मराठी समाजाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचं सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितल्याची आठवण राज ठाकरे यांनी सांगितली आहे.
आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.