विशेष प्रतिनिधी
भोपाळ : केंद्र सरकारने संसदेत मांडलेले वक्फ सुधारणा विधेयक सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात भोपाळमधील मुस्लिम महिलांनी एकत्र येत या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ( Muslim women in Bhopal say Modi ZindabadTake to the streets in support of Waqf Amendment Bill)
भोपाळमध्ये मुस्लिम महिलांनी बुरखा परिधान करून रस्त्यावर शांततापूर्ण रॅली काढली. त्यांच्या हातात “आम्ही वक्फ विधेयकाचे समर्थन करतो”, “मोदी सरकारला सलाम”, असे फलक होते. त्यांनी विधेयकामुळे महिलांना व वंचित घटकांना वक्फ मालमत्तेचा खरा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मोठ्या संख्येने महिला फलक आणि फुले घेऊन रस्त्यावर उतरल्या. यावेळी महिलांनी मोदी जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांसोबत काही पुरुषांनीही विधेयकाचे समर्थन केले. यावेळी मुस्लिम पुरुषांनीही घोषणा दिल्या, ‘मोदी तुम संघर्ष करोत, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भोपाळमधील महिला कार्यकर्त्या शबीना खान म्हणाल्या, “हे विधेयक महिलांच्या हक्कांचे रक्षण करेल. वक्फ बोर्डांमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा, हीच आमची मागणी आहे.”
लोकसभेमध्ये आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षाने सातत्याने विरोध केला. हे विधेयक आधी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले होते. त्यावर आज सभागृहात आठ तास चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय होईल.
अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर केले. ते म्हणाले, देशभरात वक्फशी निगडित 30 हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले.
वक्फ म्हणजे इस्लामिक संस्थांच्या मालकीची अशी मालमत्ता, जी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उद्देशांसाठी वापरली जाते. अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डांवर भ्रष्टाचार, अपारदर्शक व्यवहार आणि मालमत्तेच्या चुकीच्या वापराबाबत आरोप होत होते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक सादर केले आहे. या विधेयकात वक्फ मालमत्तेचा रेकॉर्ड डिजिटल करणे, अनधिकृत कब्जा रोखणे, आणि व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवणे यावर भर आहे.