विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: नागपूरच्या सुनिता जमगडे या महिला काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्यानंतर, त्या जम्मू-कश्मीरमधील कारगिलजवळील हुंडरमन गावातून एलओसी (Line of Control) ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. पाकिस्तान रेंजर्सनी सुनिता जमगडे यांना बीएसएफच्या (Border Security Force) ताब्यात दिले आहे. त्यानंतर बीएसएफने त्या अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केल्या असून त्या लवकरच नागपूरमध्ये पोहोचणार आहेत. ( Nagpurs Sunita Jamgade handed over to India by Pakistan Investigation into border crossing case underway)
सुनिता जमगडे या १४ मे रोजी बेपत्ता झाल्या होत्या. सुनीता शेवटची कारगिलमधील एका गावात दिसली होती. ती बेपत्ता होण्यापूर्वी एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती, असे लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल यांनी सांगितले होते. ती काही पाकिस्तानी नंबरशी संपर्कात होती असे तपासातून दिसून आलं आहे. ती सीमा पार करून पाकिस्तानात गेली असावी असा अंदाज वर्तवला जात होता. तिने यापूर्वीही अटारी-वाघा बाजूने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे यावेळी ती यशस्वी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
मात्र आता त्या पाकिस्तानात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या १२ वर्षांच्या मुलाला मागे ठेवून सीमारेषा पार करत पाकिस्तानात गेल्या होत्या. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्या ताब्यात घेतल्या गेल्या. त्यांच्याविरोधात चौकशी सुरू झाली.
लडाख पोलीस महासंचालक डॉ. एस. डी. सिंग जम्वाल यांनी सांगितले की, सुनिता या गायब होण्याआधीच काही पाकिस्तानी नागरिकांशी संपर्कात होत्या. त्यामुळे हेरगिरी अथवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी त्यांचा वापर झाला आहे का, याची चौकशी आता भारतीय यंत्रणा करत आहेत.
पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की, “अमृतसरमध्ये सुनिता जमगडे यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यांना नागपूरला आणले जाईल. त्यांची सखोल चौकशी केली जाईल. त्या चुकून गेल्या होत्या की मुद्दाम, हे तपासले जाईल. त्यांनी कुठल्या व्यक्तींशी संपर्क साधला होता, हेही पाहिलं जाईल.”
या प्रकरणी अमृतसर पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवली असून ती आता नागपूरच्या कापीलनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जाणार आहे,.कारण सुनिता यांचा कायमचा पत्ता नागपूरचा आहे.
सुनिता गायब झाल्यावर त्याचा १२ वर्षांचा मुलगा बाल कल्याण समितीच्या (CWC) ताब्यात देण्यात आला होता. त्यालाही आता नागपूरला आणण्यात येणार आहे. पोलीस आणि प्रशासन त्याची काळजी घेत आहेत.
सीमा ओलांडण्याच्या अशा घटनांमध्ये बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात फ्लॅग मीटिंग्स आणि संवादाद्वारे निर्णय घेतले जातात. उपायुक्त कदम यांनी स्पष्ट केले की, अशा अनेक घटना चुकून घडतात आणि त्या अधिकृत संवादातून सोडवल्या जातात.