विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणाचा पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे. पण मला ते दाखवून कोणाचे चारित्र्यहनन करायचे नाही असे सांगत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी दाखविण्यास नकार दिला. एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे? हेच आम्हाला कळत नाही आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. (Nana Patole has a pen drive in the honeytrap case refuses to show it as he does not want to defame anyone)
गुरुवारी विधानसभेत विरोधक हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. पटोले म्हणाले, मुंबईतील मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असूनही राज्याचे मंत्री याबाबत सभागृहात उभे राहून उत्तरही देत नाहीत, ना निवेदन करत आहेत. हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती राज्याबाहेर लीक होत आहे, यामध्ये काही आयएएस अधिकारी तसेच मंत्री सहभागी आहेत. माझ्याजवळ एक पेनड्राईव्हही आहे, मला ते दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे? हेच आम्हाला कळत नाही आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत अधिवेशन संपेपर्यंत म्हणजे 18 जुलै पर्यंत मंत्र्यांनी सर्व निवेदन या सभागृहात जाणावे असे निर्देश दिले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार गटाचे आमदार जयंत पाटील म्हणाले की, “नाशिकचे हनीट्रॅप प्रकरण फार गंभीर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातून महाराष्ट्राला आणि सभागृहाला या प्रकरणाबाबत आश्वस्त करावे,”
सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “तुम्हाला नावे माहिती आहेत का?” त्यानंतर ते म्हणाले की, “आपण या सर्व बाबी गांभीर्याने घेतल्या आहेत. या प्रकरणाबाबत अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनानेदेखील नोंद घेतली आहे.” असे सभागृहात स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?”
यावर स्पष्टीकरण देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” असे स्पष्ट केले. यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.