पहलगाम हल्ल्यानंतर नागरिकांच्या सुखरूप परतीसाठी शिंदेंची तत्परता, म्हस्केंच्या विधानावरून नवा वाद
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. शिंदे थेट जम्मू-काश्मीरला पोहोचून नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी हालचाली करत आहेत. Naresh Mhaske, Shiv Sena MP from Thane, Says: Bringing Back Those Who Never Traveled by Air by Air.
मात्र, या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. म्हस्के म्हणाले, “शिवसेनेच्यावतीने पर्यटकांना आणण्यात येत आहे. जे कधी विमानात बसले नाही, त्यांना विमानाने परत आणत आहोत.” त्यांच्या या विधानावर अनेकांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे.
कधी विमानात बसले नाही, त्यांना विमानाने परत आणत आहोत – शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के @nareshmhaske pic.twitter.com/RhZ7qIZxNI
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) April 24, 2025
नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?
“जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता? अहो, ४५ लोक रेल्वेने गेले होते. पहलगाममध्ये अडकले. गरीब लोकं, खाण्याचा प्रोब्लेम होता. एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोक राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ते रेल्वेने गेली होती. ते घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कुरघोडी म्हणताय?” – असं म्हणत म्हस्केंनी आपली भूमिका मांडली.
सुषमा अंधारे यांचा सवाल : “उपकार केले का तुम्ही?”
या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे, अशा संवेदनशील क्षणी सत्ताधाऱ्यांनी भान ठेवायला हवं. पण हे लोक कायमच श्रेयवादाच्या आणि कुरघोड्यांच्या राजकारणात अडकलेले दिसतात. जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत, त्यांना विमानात बसवून परत आणलं म्हणजे उपकार झाले का?” असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
पुढे काय? शिंदेंची प्रतिक्रिया महत्त्वाची
नरेश म्हस्के यांच्या विधानावर आता स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये राजकीय वाद आडवा येतो का, यावरही लक्ष केंद्रित झालं आहे.