विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हाऊस अरेस्ट’ या उल्लू अॅपवरील एका वादग्रस्त वेब शोची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यातील दृश्यांमुळे संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (suo motu) दखल घेत उल्लू अॅपच्या सीईओ विभू अग्रवाल आणि शोच्या सूत्रसंचालक एजाज खान यांना समन्स बजावले आहेत. हे समन्स ९ मे २०२५ रोजी आयोगासमोर वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे आहेत. ( National Commission for Women takes action against Ullu app summons CEO and Ajaz Khan in obscenity case)
या व्हिडीओमध्ये एजाज खान महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध खासगी, लैंगिक कृती आणि पोझिशन्स करण्यास भाग पाडत असल्याचे स्पष्टपणे दिसते. महिलांनी स्पष्टपणे नकार दिला असतानाही त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. अशा वागणुकीमुळे स्त्रीच्या सन्मानावर गदा येते, संमतीच्या तत्त्वांचा अपमान होतो आणि लैंगिक शोषणाचा प्रचार केला जातो, असा आरोप महिला आयोगाने केला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी सांगितले, “ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कोणताही कंटेंट जर महिलांना केवळ उपभोग्य वस्तू म्हणून दाखवतो, त्यांच्यावर दबाव टाकतो किंवा नैतिकतेच्या चौकटी मोडतो, तर तो पूर्णपणे अमान्य आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.”
आयोगाच्या मते, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात.
विशेष म्हणजे, ही केवळ प्रौढ महिलांच्या सन्मानाची बाब नाही, तर लहान मुले आणि किशोरवयीन प्रेक्षकांवर होणारा परिणामही तितकाच गंभीर आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने यापूर्वी युट्युबर रणवीर अल्लाबादिया यांच्या अश्लील आणि महिलाविरोधी कंटेंटविरोधातही कारवाई केली होती.
आता आयोगाने सर्व डिजिटल माध्यमांना, विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मना ताकीद दिली आहे की, ‘मनोरंजन’च्या नावाखाली स्त्रियांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, अश्लीलतेचा प्रचार अथवा महिलांचा अवमान करणारा कोणताही कंटेंट पुढे आणू नये.
महिला आयोगाने स्पष्ट केले आहे की, “स्त्रीसन्मान, कायद्याचे पालन आणि नैतिकतेचे भान राखणे हे सर्व डिजिटल माध्यमांचे कर्तव्य आहे. आयोग या प्रकारांवर सतत नजर ठेवून आवश्यक त्या कठोर कारवाया करत राहील.”
या प्रकरणी देशभरातून विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी x या सोशल मीडिया अकाउंटवर हाऊस अरेस्ट कार्यक्रमाची क्लिप शेअर केली होती. त्यांनी म्हटले आहे की, हा शो निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात हाऊस अरेस्ट शो बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
ओटीटी वेब सीरिज ‘हाउस अरेस्ट’मधील सुमारे दोन मिनिटांची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक एजाज खान हा होस्टच्या भूमिकेत दिसत असून, तो रिअॅलिटी शोदरम्यान एका स्पर्धकाला कामसूत्रातील विविध लैंगिक आसनांबाबत विचारताना दिसतो. त्यानंतर तो इतर स्पर्धकांना त्या आसनांचे (पोजिशन्स) प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगतो.