विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निशाणा साधत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईमुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानने सीमेवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताने आता “वॉटर स्ट्राईक” केला आहे. बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. (Indias water strike on Pakistan after Operation Sindoor Gates of Baglihar Salal dams opened Flood-like situation in many areas)
भारताने गुरुवारी बगलिहार आणि सलाल या जम्मू-काश्मीरमधील महत्वाच्या धरणांचे दरवाजे उघडले. त्यामुळे चिनाब नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढला असून, पाकिस्तानच्या अखनूरपासून गढखल आणि परगवाल सेक्टरमधील लष्करी चौक्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे. अनेक चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत.
यापूर्वी रविवारी भारताने चिनाब नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवत पाकिस्तानमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण केली होती. त्यामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प बंद पडले होते. आता त्याच धरणांचे दरवाजे अचानक उघडल्याने पूरस्थिती निर्माण होऊन पाकिस्तानला आणखी अडचणीत टाकले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर चिडलेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रीपासून सीमेवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला असून, १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यावर भारताने पाणी सोडून ‘जलहल्ला’ करत पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिले आहे.
इतकेच नव्हे तर, भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे पाकिस्तानला भविष्यात पाण्याविषयी कोणतीही आगाऊ माहिती देण्यात येणार नाही. “जेव्हा हवे तेव्हा दुष्काळ आणि पूर या दोन्ही परिस्थिती भारत पाकिस्तानमध्ये निर्माण करू शकतो,” असा इशारा या कृतीमधून दिला गेला आहे.दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या जिद्दीने पेटलेला भारत आता केवळ हवेतून नव्हे, तर जलमार्गानेही प्रत्युत्तर देत आहे.